रचले नाही…………
उभे रहावे किनार्‍यावरी सुचले नाही
वहात जावे प्रवाहासवे,सुचले नाही

गुपीत होते विश्वासावर उघडे केले
जनांत सारे तुझे सांगणे रुचले नाही

जगात सारे कसे चालते बघता मीही
चुकून खोटे कधी वागलो-पचले नाही

तिचे बहाणे,तिचे वागणे हॄदया माझ्या
कळून चुकले, तरी बापडे खचले नाही

उगाच वाटे जरा बोलुनी हलके होऊ
उगाच की हे कुणी गावया रचले नाही

*******************************
सुचले नाही…………

जमाव जातो कुठे, पाहुया- सुचले नाही
प्रवाहासवे पुढे जाउया- सुचले नाही

मनाकडे मी कितीकदा कुजबुजलो होतो
तुलाच सारे कधी सांगुया- सुचले नाही

जगावे कसे सांगाया ते अधीर होते
कुणास येथे गुरु मानुया-सुचले नाही

नमस्कारही कराया मला जमले होते
चमत्कार मागून पाहुया-सुचले नाही

लवाद आणि निवाड्यात मी थकून गेलो
कधी पुरावे तरी मागुया -सुचले नाही

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds